नाशिक (प्रतिनिधी): हॉटेलमध्ये सेल लावून नामांकित कंपनीच्या नावे कपडे विक्री करणा-या दोघा परप्रांतीयाविरुध्द इंदिरानगर पोलिस ठाण्यात कॉपीराईट अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामीन शरीफ अहमद कुरेशी (रा. मोतीगंज छत्ता बाजार, आग्रा, उत्तरप्रदेश) व प्रदिप अदोरीया (रा. सुकलिया, इंदूर, मध्यप्रदेश) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी लीवाईस कंपनीचे मेहुल घोले (रा. दादर मुंबई) यांनी तक्रार दाखल केली आहे. परप्रांतीय संशयितांनी गेल्या रविवार (दि.३) पासून महामार्गावरील हॉटेल एक्सप्रेस इन येथील एक्झिबिशन हॉलमध्ये कपडे आणि चप्पल, बुट विक्रीचा सेल लावला आहे.
या सेलमध्ये नामांकित विविध कंपनीचे कपडे, चप्पल बुट आणि महिलांसाठी सौंदर्य प्रसाधने ठेवण्यात आले आहे. त्यास लीवाईस कंपनीचे बनावट टॅग असलेले टी शर्ट असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाला मिळाली होती.
सोमवारी कंपनीच्या वतीने छापा टाकण्यात आला असता येथे सुमारे ९८ हजार ५०० रूपये किमतीचे बनावट टॅग असलेले टी शर्ट आढळून आले. अधिक तपास उपनिरीक्षक सोनार करीत आहेत.