नाशिक: बसस्थानकावर गर्दीत महिलांचे दागिने लंपास करणारा अट्टल चोरटा गजाआड !

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील बसस्थानकांवर बसमध्ये चढताना गर्दीमध्ये हातचलाखीने महिलांच्या गळ्यातील वा त्यांच्या पर्समधील दागिने चोरणाऱ्या अट्टल चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. चोरट्याकडून साडेतीन लाखांची चोरीच्या सोन्याच्या दागिन्यांची लगड हस्तगत केली आहे. मूळ श्रीरामपूरचा (जि. अहिल्यानगर) असलेल्या या चोरट्यावर ३० गुन्हे दाखल आहेत. साहिल निसार पठाण (२३, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे.

सध्या दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे शहरातील ठक्कर बसस्थानक, मेळा बसस्थानक आणि महामार्ग बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये या तीनही बसस्थानकांमध्ये महिला प्रवाशांना हेरून त्यांचे दागदागिने, ऐवज चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. याप्रकरणी मुंबई नाका आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले आहेत. याची गंभीर दखल पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतली असून, त्यांनी या गुन्ह्यांचा समांतर तपास शहर गुन्हे शाखेला करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी युनिट एकच्या पथकाला तपासाचे आदेश दिले होते. युनिट एकच्या पथकाने समांतर तपास सुरू केला असता अंमलदार विशाल काठे यांना संशयित ठक्कर बसस्थानकात येणार असल्याची खबर मिळाली.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

युनिट एकचे पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. संशयित चोरटा तेथे आला असता, दबा धरून असलेल्या पथकाने त्यास शिताफीने अटक केली. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने महिला प्रवाशांचे दागिने चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून साडेचार तोळे वजनाची तीन लाख ५० हजार रुपयांच्या चोरीच्या सोन्याची लगड हस्तगत केली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: पुढील पाच दिवस राज्यातील तापमानात होणार अंशतः वाढ

या गुन्ह्यात सरकारवाडा येथील चार व मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कामगिरी सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागूल, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, सुक्राम पवार यांच्या पथकाने केली.

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

असा करायचा चोरी: संशयित साहिल हा बसस्थानकात आल्यानंतर बसमध्ये चढणाऱ्यांची गर्दी होते, त्यावेळी महिलांना हेरायचा. महिला प्रवासी बसमध्ये सीट पकडण्यासाठी चढाओढ करतात, त्यावेळी तो आरडाओरडा करीत त्यांच्या गळ्यातील वा बॅगेतील पर्समधील दागिने, रोकड चोरून परत माघारी यायचा. त्यानंतर तो श्रीरामपूरला परत निघून जायचा. त्याच्यावर नाशिकसह अहमदनगर व अन्य शहरांमध्ये ३० गुन्हे दाखल आहेत. तर नाशिक आयुक्तालय हद्दीत पाच गुन्हे दाखल आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790