नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोडच्या दुर्गा मंदिरासमोर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नाशिकरोड शाखेतून शुक्रवारी (दि. २५) पहाटे ३.३० ते ५.४५ च्या दरम्यान चोरांनी खिडकीचा गज कापून कॅशियर रूममधून २५ लाख रुपयांची चोरी केली. हा प्रकार सोमवारी सकाळी अधिकाऱ्यांच्या लक्षात आला.
मुख्य प्रबंधक सुरेश बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी बँकेत १० लाख रुपयांचा हिशेब लागत नसल्याने बँक अधिकारी तो हिशेब जुळविण्यात मग्न होते. काही वेळाने हा हिशेब क्लिअर झाला. दरम्यान, बँक अधिकारी २५ लाखांची टॅली करत होते. ५०, १००, २०० रुपयांच्या नोटा त्यांनी स्टाँगरुममध्ये ठेवल्या होत्या. तर त्यानंतर ५०० रुपयांच्या १००० रुपयांचे एक बंडल असे सुतळीने बांधलेले ५ बंडल म्हणजे एकूण २५ लाख रुपये हे कॅशियर रूमच्या लोखंडी कपाटात ठेवून सर्व अधिकारी हे घरी निघून गेले.
एसबीआयच्या या शाखेतील सुरक्षारक्षक हे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतच असतात. सरकारी सुटीच्या दिवशी त्यांनाही सुटी असते. शनिवारी, रविवारी सुट्टीच होती. सोमवारी हा प्रकार लक्षात आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.