नाशिक (प्रतिनिधी): बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या मजुराला उशिरा पेमेंट दिल्याच्या रागातून मजुर आणि त्याच्या साथीदाराने ठेकेदारावर तलवारीने वार करत गंभीर जखमी केले. मखमलाबाद येथे हा प्रकार घडला.
याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुकदेव काकडे (रा. जुने सिडको) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बांधकाम प्रकल्पावर कामगारांना पैसे देत असताना संशयित गणेश शेळके आला. त्यास मजुरीचे ९०० रुपये दिले असता संशयिताने ‘ही काय पद्धत आहे, एवढे उशिरा पेमेंट केले’ असे बोलत हुज्जत घातली. काही वेळाने संशयित गजानन शेळके व दोघे वेगवेगळ्या रिक्षातून आले.
कामगारांचे पैसे वाटप करत असतांना संशयितांनी येथे ठेकेदारी करायची का नाही, असे बोलून वाद सुरू केला. एकाने रिक्षातून तलवार आणली. मावस भाऊ समजावून सांगत असताना संशयितांनी भाऊ काकडे याच्यावर तलवार उगारली. त्याला वाचविण्यास गेले असता काकडे यांच्या हातावर तलवारीचा वार लागला. वरिष्ठ निरीक्षक अतुल ढहाके तपास करत आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २३४/२०२४)