नाशिक (प्रतिनिधी): येथील कौटुंबिक न्यायालयाच्या भरोसा सेलच्या बाहेर धक्कादायक प्रकार घडला आहे. मामे सासऱ्याने जावयावर थेट चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी हल्लेखोर मामेसासऱ्याला तातडीने अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष पंडित अहिरे (रा. दहिवड, ता. देवळा) असे जखमी युवकाचे नाव आहे. संतोष अहिरे आणि त्याची पत्नी पौर्णिमा यांच्यात कौटुंबिक वाद होते. त्यांच्या लग्नाला दीड वर्षे झाली आहेत. या दोघांना सहा महिन्यांची मुलगी आहे. दोघांमध्ये वाद होत असल्याने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.
त्यामुळे या दोघांचे भरोसा सेल मार्फत समुपदेशन करण्यात येत होते. याचाच एक भाग म्हणून संतोष आणि पौर्णिमा यांना शरणपूर रोड येथील भरोसा सेल येथे समुपदेशनासाठी बोलविण्यात आले होते. त्यांचे कालचे समुपदेशन पूर्ण झाले. त्यानंतर त्यांना पुढील तारीख कळविली जाणार होती.
त्यामुळे संतोष हे भरोसा सेलच्या बाहेर उभे होते. त्याचवेळी पौर्णिमा यांचे मामा नानासाहेब नारायण ठाकरे हे तेथे आले. त्यांनी आपल्या जवळील धारधार चाकूने थेट संतोष अहिरे यांच्यावर थेट हल्ला चढविला.
पोटावर झालेल्या हल्ल्यामुळे संतोष अहिरे हे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी हा सर्व प्रकार पाहून तातडीने संतोष अहिरे यांना रुग्णालयात दाखल केले तर हल्लेखोर मामे सासरा नानासाहेब ठाकरे यास ताबडतोब अटक केली. संतोष अहिरे यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी ठाकरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.