नाशिक (प्रतिनिधी): आडगाव हददीतील विडी कामगार नगरमध्ये दोन दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरून विशांत भोये या युवकाचा खून प्रकरणातील पाच संशयितांना जेरबंद करण्यात आले आहे. यातील एक महिला व दोघांना येवल्यातून तर, एक महिला व संशयिताचा समावेश आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने सदरील कारवाई केली आहे.
सुरज रवींद्र मोहिते (२२), रवींद्र साहेबराव मोहिते (४३), व एक महिला (४०, सर्व रा. विहंग सोसायटी, विडी कामगारनगर, आडगाव) यांना येवल्यातील पिंपळखुंटे परिसरातून तर, मच्छिंद्र उत्तम जाधव (३८, रा. विडी कामगारनगर) याच्यासह एका महिलेस विल्होळीतून अटक केली आहे.
विशांत उर्फ काळू भोये (रा. विडी कामगार वसाहत) यास रविवारी (ता.२४) रात्री संशयित जमावाने क्षुल्लक कारणावरून खून केला होता.याप्रकरणी एकाला पोलिसांनी तत्काळ अटक केली होती. तर काही संशयित पसार झाले होते. भोये याच्या नातलगांनी परिसरातील वाहनांची तोडफोड करीत रास्तारोकोही केला होता. याप्रकरणी शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकची पथके संशयितांच्या मागावर रवाना झाली होती.
अंमलदार विलास चारोस्कर यांना माहिती मिळाली असता एक पथक येवला तालुक्यात गेले. त्याठिकाणी राजापूर रोडवरील पिंपळखुंटे येथे दडून असलेल्या सुरज, रवींद्र व रेखा मोहिते यांना अटक केली. तर, दुसऱ्या पथकातील अंमलदार नितीन जगताप यांना खबर मिळाली असता त्यांनी विल्होळीतून संशयित मच्छिंद्र जाधव याच्यासह एका महिलेला अटक केले.
या पाचही संशयितांनी खुनाची कबुली दिली आहे. तपासाकामी त्यांना आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कामगिरी आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सहाकय निरीक्षक हेंमंत तोडकर, चेतन श्रीवंत, महेश साळुंके, रवींद्र आढाव प्रवीण वाघमारे, पशांत मरकड, विशाल काठे, प्रदीप म्हसदे, विशाल देवरे, नितीन जागताप, विलास चारोस्कर, अप्पा पानवळ, मुक्तार शेख, आंदीनी बजावली.