नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
२३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नाशिक (प्रतिनिधी): रात्रीच्या वेळी पेट्रोल पंप, गॅरेज व रस्त्यालगत उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांमधून डिझेल चोरी करायची अन् शहरासह ग्रामीण भागात घरफोडी, दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा आडगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
पोलिसांनी चौघांच्या टोळीला बेड्या ठोकून त्यांच्याकडून दोन चारचाकी, एक दुचाकी तसेच सोन्या चांदीचे दागिने असा जवळपास २३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घरफोडी करणाऱ्या चौघा संशयित आरोपींमध्ये दिंडोरी तालुक्यातील दोन सख्खे भाऊ तर उर्वरित नांदूरनाका व मोरे मळ्यातील रहिवासी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संशयित आरोपींनी आडगाव पोलिस ठाणे, दिंडोरी, वाडीव-हे, ओझर आणि पिंपळगाव बसवंत परिसरात डिझेल चोरी घरफोडी तसेच दुचाकी चोरी केल्याचे समोर आले आहे.
शिवाजी उर्फ शिवा सदाशिव मालखेडे (२१) महेश सदाशिव मालखेडे (१९, रा. जऊळके फाटा), संजय छोटू पहाडे (१९.रा. मोरे मळा) व श्रावण पोपट भालेराव (२३, रा. जनार्दन नगर, नांदूर नाका) या चौघांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींपैकी काहीजण पंचवटी व मोरे मळा परिसरात राहत असल्याची माहिती गुन्हा शोध पथकाचे हवालदार दादासाहेब वाघ व सचिन ग्राहिकर यांना मिळाली होती. माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना कळविण्यात आल्यानंतर चव्हाण यांच्या आदेशाने आडगाव गुन्हे शोध पथकाने शोध सुरू केला होता. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण, पोलिस हवालदार सुरेश नरवडे, शिवाजी आव्हाड, नीलेश काटकर, दादासाहेब वाघ, अमोल देशमुख, दिनेश गुबाडे, देवराम सुरंजे, निखिल वाघचौरे, इरफान शेख, सचिन बाहिकर आदींनी सापळा रचून अटक केली पोलिसांनी चौघांकडे चौकशी केली असता त्यांनी घरफोडी, चोरी, डिझेल चोरी असे वेगवेगळे सात गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
टोळीकडून वेगवेगळ्या वाहनांचा वापर:
आडगाव पोलिसांनी अटक केलेले चारही संशयित आरोपी अगोदर डिझेल चोरी करायचे ते डिझेल चोरीसाठी इनोव्हा कार वापरायचे तर घरफोडी करण्यासाठी डस्टर कार वापरत होते. गुन्ह्यात वापरलेली डस्टर गाडी क्रमांक (एमएच.०४ एचटी६६५५), दुचाकी (एमएच१५ जे एफ ३२२२), इनोव्हा कार (एमएच०३ झेड ४९२४) पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
मुलगी पाहण्यासाठी डस्टर नेली अन् घरफोडी:
आरोपींनी घरफोडी करण्यासाठी अनोखी शक्कल लढविली. मुलगी बघण्यासाठी बाहेरगावी जायचे असे सांगून संशयितांनी एका मित्राची डस्टर चारचाकी घेतली.
थेट पिंपळगाव गाठून एका बंगल्यात घरफोडी केली होती. तर आडगाव शिवारात डिझेल चोरी करतेवेळी संशयित सापडल्याने त्यांनी इनोव्हा कार तेथेच सोडून पलायन केले होते.
आडगाव पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत संशयितांचा माग काढत ताब्यात घेतले. एक दुचाकी, दोन चारचाकी, तसेच अंदाजे १२ ते १५ तोळे सोन्या-चांदीचे दागिने पोलिसांनी संशयित आरोपींकडून जप्त केले आहे.