नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): ड्रग्ज माफिया ललित पानपाटील हा पुण्यातून ‘एमडी’ची तस्करी करीत असताना मुंबईतील संशयितांना हाताशी धरून नाशिकमध्ये संशयित अर्जुन पिवाल याने एमडी विक्री सुरू केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
अर्जुनसह इतर चौघांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने पाच दिवसांची वाढ केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शहरासह जिल्ह्याबाहेर धाडसत्र राबवून एमडीच्या साठ्याचा शोध सुरू केला आहे. वडाळागाव एमडी विक्री प्रकरणातील संशयित सलमानचेही राजकीय ‘कनेक्शन’ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सामनगाव एमडी प्रकरणात नाशिक पोलिसांनी सनी व सुमित हे पगारेबंधू, मनोज गांगुर्डे व अर्जुन पिवाल या संशयितांना अटक केली आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ठाणे येथून भूषण ऊर्फ राजा गणपत मोरे (वय ३६, रा. ठाणे) याला अटक केली. सध्या हे पाचही जण पोलिस कोठडीत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरासह जिल्ह्यात छापासत्र सुरू आहे. त्यातून एमडीचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
पिवाल, पगारे व गांगुर्डे हे चौघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांनी करोनापूर्वी कारागृहात असताना तेथील इतर संशयितांच्या माध्यमातून मुंबईतील एमडी तस्करीची माहिती मिळविली. जामिनावर कारागृहाबाहेर आल्यावर अर्जुनने नाशिकमध्ये एमडी विक्रीला सुरुवात केली. तोपर्यंत ललितनेही गुन्हेगारीत पाऊल टाकून येरवडा कारागृहातून ‘छोटा राजन’ गँगच्या साथीदारांद्वारे एमडी बनविणे व तस्करी सुरू केली होती.
२०१९ दरम्यान नाशिकच्या दोघांनी एकाच वेळी दोन स्वतंत्र जिल्ह्यांत एमडीची तस्करी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासानुसार ललित व भूषण पानपाटील यांनी नाशिकमध्ये एमडी विक्री केलेली नाही. अर्जुन हाच नाशिकमध्ये मुंबईतून माल आणून इतर संशयितांच्या माध्यमातून विक्री करीत होता. त्यामुळे अर्जुनच्या टोळीची कसून चौकशी सुरू आहे. त्यांनी आणलेला माल कोठे दडविला, मालविक्रीची पद्धत, मालाची विल्हेवाट लावली का, माल कोठून विक्री व्हायचा यासंदर्भातील तपास सुरू आहे. पोलिसांना बऱ्यापैकी एमडी साठ्याची माहिती हाती लागली आहे. त्यानुसार जिल्ह्याबाहेरील ‘एमडी’चे मोठे घबाड लवकरच नाशिक पोलिस उघड करण्याची शक्यता आहे.