नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोडच्या जयभवानी रोडच्या भालेराव मळ्यातील किराणा दुकानदारास संशयित टोळक्याने दिवसाला हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करीत डोक्यात बंदुकीच्या बटने फटका मारून, कोयत्याने वार करीत गंभीर जखमी केले. याप्रकरणी उपनगर पोलिसात संशयित टोळक्याविरोधात खंडणीसह प्राणघातक हल्ल्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहिल म्हस्के, सागर म्हस्के, सुरेश म्हस्के, धनंजय म्हस्के, बंटी अशी संशयितांची नावे आहेत. तर, संशयित महेंद्र सतिश गील (१९, रा. माणिकनगर, जयभवानी रोड) यास अटक केली असून, त्यास न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता. २५) पोलीस कोठडी सुनावली आहे. पसार झालेल्या संशयितांचा उपनगर पोलिस शोध घेत आहेत. देवानंद शांताराम भालेराव (रा. भालेराव मळा, जयभवानी रोड, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे किराणा दुकान आहे. ते सोमवारी (ता. २१) रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यांचे किराणा दुकान बंद करीत होते. दुकानाबाहेरील आईस्क्रिमचे फ्रीज आतमध्ये घेत होते. त्याचवेळी दुकानात संशयित सागर व साहिल म्हस्के हे आले. यातील साहिल याने बंदुक सदृश्य हत्याराच्या बटने त्यांच्या डोक्यात फटका मारला.
त्यामुळे ते खाली वाकले असता, त्याचवेली संशतिय सागर याने त्याच्याकडील कोयत्याने वार करीत त्यांना गंभीर जखमी केले. तर, संशयित धनंजय व बंटी यांनी दुकानातील ट्रेमधील काचेच्या बाटल्या, ट्रे दुकानावर फेकून दुकानाची व सामानाची तोडफोड केली.
यापूर्वी संशयितांनी १९ तारखेला संशयितांनी दुकानात येऊन दररोज एक हजार रुपये खंडणी देण्याची मागणी केली होती. याच कारणातून संशयितांनी भालेराव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसात खंडणीसह प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर हे करीत आहेत. (उपनगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३७१/२०२४)