नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): एकलहरा – सामनगाव रोडवरील टेलरिंग मटेरियल दुकानात साडीचा फॉलच्या खरेदीच्या बहाण्याने आलेल्या संशयिताने ७३ वर्षीय महिलेवर धारदार हत्याराने वार करीत जखमी केले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत व कानातील दागिने असा १ लाख २० हजारांचा ऐवज हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली.
भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात भितीचे वातावरण आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शकुंतला दादा जगताप (७३, रा. नवीन सामनगाव) या संशयिताच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. समाधान दादा जगताप यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे एकलहरा-सामनगाव रोडवरील गाळ्यामध्ये टेलरिंग मटेरियल विक्रीचे दुकान आहे.
गेल्या सोमवारी (ता.१) त्यांची आई शकुंतला जगताप या दुकानावर होता. दुपारी साडेतीन पावणे चारवाजेच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून एक संशयित दुकानात आला आणि त्याने साडीच्या फॉलची मागणी केली.
शकुंतला या फॉल घेण्यासाठी मागे वळल्या असता, संशयिताने पाठीमागून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शकुंतला यांनी जोरदार विरोध केल्याने संशयिताने त्याच्याकडील धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यावर वार केल्याने त्या खाली पडल्या.
संशयिताने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत व कानातील सोन्याचे दागिने असा १ लाख २० हजारांचा ऐवज खेचून पोबारा केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक गणेश शेळके हे तपास करीत आहेत.