नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): बँकेत भरणा करण्यासाठी सव्वाचार लाख रुपये घेऊन जाणाऱ्या इसमास दोन तरुणांनी रस्त्यात अडवून त्यांच्याकडील रोकड व मोपेड अॅक्टिव्हा बळजबरीने हिसकावून लुटून नेल्याची घटना गणेशवाडीत घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी संजय बाबूलाल सोळंकी (रा. ऋषिकेश अपार्टमेंट, मधुबन कॉलनी, पंचवटी) हे नानावली येथील प्रशांत मार्केटिंग व प्रशांत डिस्ट्रिब्युटर्स या कंपनीमध्ये काम करतात. सोळंकी हे काल (दि. १८) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे कंपनीत कामाला गेले. तेथील काम करीत असताना सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कंपनीचे मालक प्रफुल्ल जैन यांनी कार्यालयात जमा झालेली ४ लाख १७ हजारांची रक्कम ही फिर्यादी सोळंकी यांना शरणपूर रोड येथील डी. बी. एस. बँकेत जमा करण्यास सांगितले.
त्यानुसार सोळंकी हे एमएच १५ सीएफ १२१४ या क्रमांकाच्या अॅक्टिव्हा मोपेडवर बसून बँकेत पैशांचा भरणा करण्यासाठी जात होते. ते पंचवटीच्या गणेशवाडीतील सुलभ शौचालयाजवळ आले असता आरोपी फरहान खान मुदस्सर खान (वय १९, रा. पंचशीलनगर) व राशीद (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) या दोघा तरुणांनी सोळंकी यांना रस्त्यात अडविले.
त्यानंतर त्यांना धक्काबुक्की करीत त्यांच्या ताब्यात असलेली ४ लाख १७ हजार रुपयांची रोख रक्कम व १५ हजार रुपये किमतीची अॅक्टिव्हा मोपेड असा एकूण ४ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज सोळंकी यांना गंभीर जखमी करून बळजबरीने हिसकावून चोरून नेला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दोघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर करीत आहेत. (पंचवटी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५३२/२०२४)