नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी येथील सिलिंडरचा काळाबाजार उद्ध्वस्त करून २४ तास उलटत नाहीत तोच भद्रकाली पोलिसांनी गंजमाळ परिसरातील दोन ठिकाणी धाड टाकून तब्बल १८० सिलिंडर जप्त केले. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही दिवस झालेल्या कारवायांमुळे शहरांमध्ये सिलिंडरचा काळाबाजार सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे.
शहरातील मध्यवर्ती भागातील गजबजलेल्या खडकाळी सिग्नलला लागून मिल कुंपणाच्या बाजूला गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती गॅस वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे भरण्याचा धंदा सुरू होता. पोलिसांनी छापा मारून दोघांना ताब्यात घेतले असून, २ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपी नाविद अख्तर काझी (३८, रा. नाईकवाडीपुरा, जुने नाशिक) व शाकीर मोहम्मद शहा (२५, रा. सुंदरनगर, देवळाली गाव) हे दोघे जण घरगुती वापरासाठी असलेले भारत गॅस व एच. पी. गॅस कंपनीचे भरलेले व रिकामे गॅस सिलिंडर खडकाळी सिग्नलच्या बाजूला मिलच्या कुंपणात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररीत्या बाळगताना मिळून आले.
पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई करून नाविद काझी याच्याकडे असलेले २६ हजार रुपये किमतीचे भारत गॅस कंपनीचे १३ गॅस सिलिंडर, ६९ हजार रुपये किमतीचे भारत गॅस कंपनीचे ६९ गॅस सिलिंडर, १२ हजार रुपये किमतीचे १२ रिकामे गॅस सिलिंडर, ५ हजार रुपये किमतीचा गॅस भरण्यासाठी लागणारा इलेक्ट्रिक पिस्टन, पाच हजार रुपये किमतीचा एलपीजी गॅस भरण्यासाठी लागणारा पिस्टन व त्याला संलग्न लोखंडी स्टॅण्ड, चार हजार रुपये किमतीचे दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटे असा १ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल तर दुसरा आरोपी शाकीर शहा याच्या पत्र्याच्या शेडमध्ये साहित्य मिळून आले. (भद्रकाली पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३५३/२०२४)
२ लाख ६४ हजारांचा माल जप्त:
दोन्ही आरोपींच्या कब्जातून एकूण २ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी घरगुती गॅस खासगी वाहनांमध्ये भरण्याचा अवैधरीत्या सुरू असलेला अड्डा उद्ध्वस्त केला. पोलिस कर्मचारी योगेश माळी यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात नाविद काझी व शाकीर शहा या दोघांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक पवार करीत आहेत.