नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): ‘मुलाला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे नाहीत, अन् दारु प्यायला पैसे आहेत?’ असे मामाने भाच्याला सुनावलं होतं. त्या रागाच्या भरात भाच्याने मामाची हत्या केली. नाशिकच्या पंचवटी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
मच्छिंद्र मानभाव असे हत्या करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर बाबुलाल सोमा गावित (वय ७४, राहणार: पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे) असे मृत्यू झालेल्या मामाचे नाव आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
भाच्याने मामाचा खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात घडली आहे. बाबुलाल सोमा गावित हे गेल्या दोन महिन्यांपासून पंचवटीतील हिरावाडी परिसरात आपला भाचा मच्छिंद्र मानभाव याच्याकडे राहत होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ‘तुझ्या मुलाच्या पायाला चटके लागले आहेत, त्याला दवाखान्यात दाखवायला तुझ्याकडे पैसे नाहीत. पण दारू प्यायला पैसे आहेत’ असे मामा बोलल्याचा मच्छिंद्र याला राग आला.
रागाच्या भरात मच्छिंद्र याने घरातील पलंगावर बसलेल्या आपल्या मामाला खाली जमिनीवर आपटले. तसेच प्लास्टिकची झाडाची कुंडी मारुन फेकली. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने मामाचा काही वेळातच मृत्यू झाला.
मृतदेह दिवसभर घरातच:
धक्कादायक बाब म्हणजे, मच्छिंद्र याने मामाला संपवल्यानंतर मृतदेह शुक्रवारी दिवसभर घरातच ठेवला होता. पोलीसांकडे तक्रार देण्यासही कोणी पुढे येत नव्हते. अखेर शनिवारी पोलिसांनी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आणि रविवारी शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर नाशिकमधील पंचवटी पोलिसांनी भाचा मच्छिंद्र मानभाव विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला बेड्या ठोकल्या. पोलिस त्याच्याकडे चौकशी करत आहेत.
बाबुलाल सोमा गावित यांना दुखापतीनंतर नाशिक येथील सिव्हील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. पण डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. सिविल हॉस्पिटल नाशिक येथे मयताचे पोस्ट मॉर्टम झाले. पोटात मार लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला असा अहवाल दिला. 67 वर्षीय श्रीमती इंदुबाई सुखदेव खाणे यांच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलिसांनी आरोपी मच्छिंद्र याच्याविरोधात भादंवि कलम 302’ 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी 27 वर्षीय मछिंद्र सुकदेव मानभाव हा हिरावाडी येथील राहणारा आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदन बागडे करत आहेत.