नाशिक (प्रतिनिधी): अज्ञात चोरट्याने फ्लॅटच्या चौथ्या मजल्यावरील लोखंडी ग्रील नसलेल्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश करून तब्बल ३ लाख ८२ हजाराचा ऐवज लंपास केला. खिडकीला स्लायडिंग काचा होत्या. टिळकवाडी येथे पुर्वांकूर अर्पाटमेंटमध्ये चोरीची घटना गुरुवारी (दि. १४) रात्री घडली. रोहन काळे हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते.
चोरट्यांनी थेट गच्चीवरून दोर अन् पाइपच्या सहाय्याने चौथ्या मजल्यावरील गॅलरीत प्रवेश केला. तेथे स्लायडिंग काचेची खिडकी होती. ती उघडून चोरट्यानी आपले काम साध्य केले. १ लाख ५० हजारांची रोख रक्कम, अमेरिकन डॉलर, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट तसेच सहा ग्रॅम वजनाचे गळ्यातील गंठण, १५० ग्रॅमचे चांदीचे साहित्य, विदेशी पाच घड्याळ, सात भारतीय बनावटीची घड्याळे असा ३ लाख ८२ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला.
चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त करून ठेवला होता. पोलिसांनी गुन्ह्याची उकल होण्यासाठी श्वान पथकाला पाचारण केले होते. मात्र, श्वानाने माग दाखविला नाही. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २८४/२०२४)
![]()


