नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): आर्थिक गुंतवणुकीवर दामदुप्पट योजनेचे आमिष दाखवून संशयितांनी तिघांना तब्बल १० लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेषतः गुंतवणुकीची रक्कम घेतल्यावर बनावट पोलिस आणत पैसे देणाऱ्यांनाच सिनेस्टाइल धमकावल्याचा प्रकार केल्याने या प्रकरणी संशयितांविरोधात मुंबई नाका पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी साडेसहाला छान हॉटेलमागे घडला.
सचिन नागनाथ तळेकर (वय ४५, रा. सोलापूर) याच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी कारभारी शिंदे (रा. खडक माळेगाव, ता. निफाड, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, दोन वर्षांपूर्वी शिंदे यांचा भाचा नितीन धोत्रे याच्या ओळखीतून संशयित सचिन तळेकर याच्याशी ओळख झाली होती. दोन महिन्यांपूर्वी संशयित तळेकर याने शिंदे यांना फोनवरून संपर्क साधला आणि त्यांना आर्थिक गुंतवणुकीवर दामदुप्पट योजनेचे आमिष दाखविले. सुरवातीला शिंदे यांनी नकार दिला; परंतु संशयित तळेकर याने सातत्याने त्यांना संपर्क साधून योजनेची माहिती देत विश्वास संपादन करून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार, शिंदे यांच्यासह प्रदीप थोरात (रा. नांदगाव), ओंकार काळे यांनी दहा लाख रुपये जमा केले होते.
संशयित तळेकरला भेटण्यासाठी. फिर्यादी शिंदे हे शुक्रवारी विंचूर येथे गेले. तिथून दुपारी साडेतीनला तळेकरच्या कारमधून दोघे परत नाशिकला आले. शिंदे हे मित्र प्रदीप थोरात व ओंकार काळे हेही नाशिकला पोहोचले. तळेकरने कार मुंबई नाका परिसरात पार्क केली आणि तिथून फिर्यादी व तळेकर रिक्षाने मुंबई- आग्रा महामार्गावरील हॉटेल छानच्या मागील परिसरात पोहोचले. तळेकरने फिर्यादीसह दोन्ही मित्रांना दामदुप्पट योजनेची माहिती समजावली.
योजना खरी वाटल्याने काळे व थोरात यांनी त्यांच्याकडील दहा लाख फिर्यादी शिंदे यांच्याकडे दिले. त्यानंतर दोघे पायीच निघाले असता, रस्त्यात एक अज्ञात व्यक्ती भेटल्यावर संशयिताने फिर्यादीने पुढे चालण्यास सांगितले. तेव्हाच मोपेडवरून आणखी एक संशयित आला असता, संशयिताने त्याच्याकडे पैसे देण्यास सांगितले. पैसे घेतल्यावर संशयित निघून गेला. थोड्याच वेळेत तीन दुचाकीवरून तिघे संशयित आले.
पोलिस असल्याचे सांगत त्यांनी ‘तुम्ही बनावट नोटा देतात का? आमच्यासोबत पोलिस ठाण्यात चला’, असे सांगून त्यांनी संशयित तळेकर, त्याचा मित्र व फिर्यादी ज्यांना दुचाकीवरून विनयनगर पोलिस चौकीजवळ नेले. चौकीच्या अगोदर काही अंतरावर फिर्यादीला उतरवून ‘इथून निघून जा, नाहीतर तुम्हाला सहा महिने जेलमध्ये बसावे लागेल’, असे सांगून तिथून निघून गेले. फिर्यादीने त्यांच्या मित्रांना कळविल्यानंतर सर्वजण तिथे पोहोचले. संशयित तळेकरला फोनवरून. संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मुंबई नाका पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली.