नाशिक (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील परिमंडळ २मधील नाशिकरोड, उपनगर, अंबड, इंदिरानगर, सातपूर या पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या अवैध शस्त्रसाठा शोध मोहिमेअंतर्गत पोलिसांनी तीन पिस्तूल (गावठी कट्टा) तीन तलवारी आणि सहा कोयते जप्त केले आहेत. याप्रकरणी डझनभर आरोपींविरुद्ध बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे नऊ दिवस शिल्लक राहिले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवायांचा वेग अजून वाढविला आहे. मतदानप्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे.
याचाच एक भाग म्हणून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी, शेखर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पाचही पोलिस ठाण्यांच्या पोलिस अधिकारी, अंमलदारांनी या शोधमोहिमेत सहभागी होत संशयितांची घरझडती घेतली.
यावेळी १९८ गुन्हेगारांची घरे तपासण्यात आली. यावेळी नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन गावठी कट्टे, उपनगरच्या हद्दीत एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला.
कारवाईचा इशारा:
विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगार, तडीपार तसेच घातक हत्यारे, अग्निशस्त्रे बाळगून गुन्हे करणारे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.