नाशिक (प्रतिनिधी): शहरातील बसस्थानकांवर प्रवाशांचा ऐवज चोरणारी टोळी सक्रिय असताना, रिक्षा प्रवास करण्याऱ्या प्रवाशांचीही सुरक्षितता राहिलेली नाही. दोघी ज्येष्ठ महिलांना रिक्षा प्रवासात आपला ऐवज गमवावा लागला आहे. सहप्रवासी असलेल्यांनी दोन्ही घटनेत तब्बल ३ लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
याप्रकरणी पंचवटी, मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. रविवार कारंजा ते पंचवटी कारंजा या दरम्यान रिक्षात प्रवास करताना जेष्ठ महिलेच्या हातातील पिशवी कापून त्यातील सव्वा लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केली.
छबुबाई मनोहर धोत्रे (६१, रा. म्हाडा अपार्टमेंट, कलानगर) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. ९) दुपारी दोनच्या सुमारास त्या रविवार कारंजा येथील बँकेतून पायी चालत रविवार कारंजा येथे आल्या. येथून त्या रिक्षाने रविवारी कारंजा ते पंचवटी कारंजा असा प्रवास केला. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील पिशवी खालच्या बाजुने कापली. त्यामुळे पिशवीतून सोन्याचे दागिने व ९ हजारांची रोकड असा १ लाख २९ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल केला असून हवालदार सोर हे करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेमध्ये इंदिरानगर ते महामार्ग बसस्थानक दरम्यान रिक्षा प्रवासादरम्यान अज्ञात महिलांनी प्रवासी महिलेच्या पर्समधील सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या. शुभांगी रामदास क्षीरसागर (६०, रा. शांतीमंगल अपार्टमेंट, पेठेनगर, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (ता.८) सायंकाळी पाचच्या सुमारास रिक्षातून (एमएच १५ एफयु २२४३) महामार्गावर आल्या. त्यावेळी रिक्षात असलेल्या दोघा अज्ञात महिलांनी त्यांच्या पर्समधील १ लाख ५० हजारांच्या सोन्याच्या चार बांगड्या लंपास केल्या. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.