नाशिक (प्रतिनिधी): पोटच्या दोन मुलींना विषारी औषध देत देत आईने स्वतः इमारतीच्या पाचव्या मजल्याहून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना इच्छामणीनगर, हरिवंदन सोसायटीत बुधवारी (दि. ८) घडली होती.
आत्महत्येपूर्वी महिलेने लिहिलेली चिठ्ठी आणि केलेला व्हिडिओ यावरून आडगाव पोलिसांनी विवाहितेचा पती, दिर आणि नणंद यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली. पोलिसांनी दिलेली माहिती आणि राजश्री कौटकर (रा. सिन्नर फाटा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगी अश्विनी हिचे २०१३ मध्ये स्वप्नील निकुंभ याच्यासोबत लग्न झाले होते.
लग्नाच्या काही दिवसांत दिर तेजस निकुंभ ऊर्फ शंभू आणि नणंद मयुरी सोमवंशी ऊर्फ ताऊ यांनी अश्विनीच्या चारित्र्यावर संशय घेत माहेरून पैसे आणावे या कारणातून शारीरिक व मानसिक छळ करत असल्याने मुलगी अश्विनी हिने आराध्या (८), अगस्त्या (२) या दोन मुलींसह आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांत दिली.