नाशिक (प्रतिनिधी): लग्नाचे आमिष दाखवून मुंबईच्या तरूणीवर एकाने वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. जुर्गन मॅक्सवेल रोझ (२७ रा. हरिओम फेज २ पांडवनगरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२३ मध्ये पीडिता नवी मुंबई येथे एका खासगी कंपनीत काम करीत असतांना तिची संशयिताशी ओळख झाली. दोघांच्या या ओळखीचे रूपांतर अवघ्या काही दिवसातच प्रेमात झाले. त्यानंतर दोघे काम करीत असलेली कंपनी बंद पडली. पीडितेने एका कंपनीत वर्क फ्रॉम काम सुरू केले. त्या दरम्यान तिच्या आई वडिलांचे आणि तिचे वाद झाल्याने तिला संशयिताने नाशिकला येवून वर्क फ्रॉम होम काम करण्यास सांगितले. त्यामुळे पीडिता मार्च महिन्यात घरात कुणालाही काही एक न सांगता नाशिकला दाखल झाली.
संशयितासमवेत राहत असतांना त्याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचे पीडितेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबरोबरच बरमपूर, वसई येथेही संशयिताने तिच्या असह्येताचा फायदा उचलत बलात्कार केला. पीडितेने लग्नाचा तगादा लावला असता त्याने नकार दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. संशयितास पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास उपनिरीक्षक मनिषा शिंदे करीत आहेत.
![]()


