नाशिक (प्रतिनिधी): उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर भागात किरकोळ कारणातून शुक्रवारी (दि.६) टोळक्याने हॉटेलचालक नितीन शंकर शेट्टी (३८) याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवून निघृणपणे ठार मारल्याची घटना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या घराजवळ घडली होती.
मुंबईनाका पोलिसांनी टोळक्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपासपथके रवाना केली होती. पथकाने वाघाडी नाल्याजवळच्या एका निर्जन भागात सापळा लावून पाठलाग करत संशयित आरोपी रोशन अशोक निसाळ (२३), गणेश यादव लाखन (३१), नितीन दिलीप गांगुर्डे, गोविंद सुभाष निसाळ (२३), राजेंद्र लाखन (३५) यांना बेड्या ठोकल्या.
उंटवाडीरोडवरील संभाजी चौकातील क्रांतीनगर याठिकाणी या चौघांनी येऊन नितीन यास शिवीगाळ करत धारदार शस्त्राने हल्ला चढविला. या सर्वांनी त्याला घराजवळ जमिनीवर पाडून ठार मारल्याचे फिर्यादी नितीन यांची बहीण सोनाली चौधरी (३४) यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलिसांनी या चौघांसह त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरिक्षक संतोष नरूटे यांनी त्वरित सहायक निरीक्षक सुधीर पाटील, सतीश शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करून आरोपींच्या शोधार्थ रवाना केली.
शिरसाठ यांच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पथकाने पंचवटी गाठले. वाघाडी नाल्याजवळ मेरीच्या जागेत हे चौघे झाडीझुडपांत लपून बसलेले होते, अशी माहिती पथकाला मिळालेली होती. पथकातील उपनिरिक्षक रोहिदास सोनार, राजू टेमगर, सचिन चौधरी, सागर जाधव, जुबेर सय्यद, फरीद इनामदार, राजेंद्र नाकोडे, नवनाथ उगले, श्रीकांत कर्पे यांनी सापळा रचून त्या जागेभोवती चौहोबाजूने घेराव घालण्याचा प्रयत्न केला असता संशयितांना पोलिसांची कुणकुण लागली. त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पथकातील पोलिसांनीही त्यांचा पाठलाग करून चौघांना शिताफीने ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. या चौघांची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सहायक निरिक्षक सुधीर पाटील हे करीत आहेत.
‘रोजीरोटी’ला लाथ मारली म्हणून हल्ला:
इडली-डोसा विक्रीच्या हातगाडीला नितीन याने शुक्रवारी सकाळी लाथ मारल्यामुळे रोजीरोटी’ला लाथ मारली म्हणून त्याचा राग अनावर झाल्याने सहा जणांच्या टोळक्याने सायंकाळी त्याच्यावर हल्ला चढवून ठार मारल्याचे पोलिसांच्या तपासातून प्रथमदर्शनी समोर आले आहे. शेट्टीच्या घरावरही टोळक्याने दगडफेक करून हॉटेलचीही तोडफोड केली.