नाशिक (प्रतिनिधी): रिक्षा भाडे देण्याच्या वादातून चालकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने प्रवाशास बेदम मारहाण केल्याची घटना चोपडा लॉन्स भागात घडली. पाठलाग करीत आलेल्या टोळक्याने लाथाबुक्यांसह लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने प्रवासी गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपक चंद्रकांत भदाणे (३७ रा. पेठरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भदाणे रविवारी (दि.६) सिडको परिरात गेले होते. राणेनगर येथील बोगदा भागात त्यांचा प्रवासी भाड्यावरून अनोळखी रिक्षाचालकाशी वाद झाला होता. काम आटोपून रात्री ते गंगापूररोडकडून चोपडा लॉन्स मार्गे रस्त्याने पायी पेठरोडच्या दिशेने जात असतांना ही घटना घडली.
चोपडा लॉन्स परिसरातील गोदावरी नदी पुलावर रिक्षातून आलेल्या तीन ते चार जणांच्या टोळक्याने भदाणे याची वाट आडवित व शिवीगाळ करीत त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. याप्रसंगी संतप्त रिक्षाचालकाने लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केल्याने भदाणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एक अनोळखी रिक्षाचालक व त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार शेळके करीत आहेत.