नाशिक (प्रतिनिधी): बेकरी पदार्थ विक्री करणाऱ्या दुचाकीचालकाची दुचाकी अडवून बळजबरीने मोबाइल काढून घेण्याचा प्रयत्न केला. विक्रेत्याने प्रतिकार केला असता संशयितांनी कोयत्याने वार करत जखमी केले. जीव वाचवण्याकरता पळत असतांना संशयितांपैकी एकाने चाकू फेकून मारत जखमी केले. पहाटे ६.३० वाजता नाशिकरोड येथे हा प्रकार घडला. संशयितांनी हा गुन्हा करण्यापूर्वी पेट्रोलपंपावर बळजबरीने पेट्रोल भरून कामगाराला कोयत्याचा धाक दाखवत पलायन केले होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि मुशरफ खान (रा. देवळालीगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पहाटे ६.३० वाजता रेल्वेस्थानक परिसरात बेकरी पदार्थ विक्री करुन दुचाकीने घरी जात असतांना संशयित राहुल तेलोरे, भूषण जाधव, वैभव पाटील, दर्शन भालेराव यांनी दुचाकी अडवली.
खिशातून मोबाइल काढण्याचा प्रयत्न केला. खान यांनी प्रतिकार केला असता एकाने कोयत्याने वार केला. खान हे जीव वाचवण्याकरिता बेकारीकडे पळत असताना संशयितापैकी एकाने पाठीमागून चाकू मारून फेकल्याने हा चाकू उजव्या मांडीत शिरून ते जखमी झाले. वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांचे पथक तपास करत आहे. (नाशिकरोड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ६४९/२०२४)