नाशिक (प्रतिनिधी): दांडिया खेळण्यासाठी आलेल्या तरुणीच्या मैत्रिणीसोबत जुन्या भांडणाची कुरापत काढून धक्काबुक्की करत तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत उपनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी ही मैत्रीण व तिच्या बहिणीसोबत धोंगडेनगर येथे दांडिया खेळण्यासाठी आली होती. त्यावेळी संशयित आरोपी प्रेम धेनवाल (रा. फर्नांडिसवाडी, जय भवानी रोड, नाशिक) याने पीडितेच्या मैत्रिणीसोबत जुन्या भांडणाची कुरापत काढून तिला धक्काबुक्की व शिवीगाळ केली.
फिर्यादी पीडित तरुणी याचा जाब विचारण्यासाठी गेली असता संशयित आरोपी प्रेम धेनवाल याने स्त्रीमनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग करून तिला मारहाण केली. संशयित आरोपीने फिर्यादीच्या पोटात तसेच तोंडावरची लाथ मारली. त्यावेळी पीडितेची बहीण हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करीत तिलाही शिवीगाळ व मारहाण केली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात प्रेम धेनवालविरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३४४/२०२४)