नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): जुना गंगापूर नाका येथे असलेल्या आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या शाखेतील लॉकरमधील ग्राहकांचे सुमारे ५ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने दोघा चोरट्यांनी चोरून नेले आहे. सदरची घटना बँकेतील सीसीटीव्हीत कैद झाली असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयेश कृष्णदास गुजराथी (रा. खंडेराव नगर, पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, ते जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स शाखेचे ॲडमिन मॅनेजर आहेत. शनिवारी (ता. ४) सकाळी शाखेचे मॅनेजर चंद्रकांत मुठेकर यांनी शाखा उघडली. त्यानंतर गोल्ड लोनचे किरण जाधव हे दिवसभर शाखेत काम करीत होते.
सायंकाळी पाऊणे सहाच्या सुमारास ग्राहक त्यांचे सोन्याचे दागिने सेफ्टी लॉकरमध्ये ठेवण्यात आले. त्यावेळी ग्राहक व क्रेडिट मॅनेजर सिद्धांत इकनकर हे दोघे त्यांच्याकडील चावी घेऊन लॉकर उघडले असता, लॉकर रिकामे होते.
ग्राहकाचे लॉकरमधील दागिने गायब होते.यानंतर तातडीने सीसीटीव्ही तपासले असता, शनिवारी (ता.४) पहाटे अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान, दोघा संशयितांनी बिझनेस मॅनेजरच्या कार्यालयाच्या खिडकीतून आत प्रवेश केल्याचे लक्षात आले.
संशयितांनी सेफ्टी लॉकरच्या चाव्या मिळवून २२२ ग्राहकांचे लॉकरमधील १३,३८५.५३ ग्रॅम सोन्याचे सुमारे ४ कोटी ९२ लाखांचे दागिने चोरून नेले आहेत.. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ ते ३० वयोगटातील दोघे संशयित आहेत. पोलीस आता या भामट्यांचा शोध घेत आहेत.