नाशिक: कोयताधारी टोळक्याचा युवकावर प्राणघातक हल्ला

नाशिक (प्रतिनिधी): परिसरात गुरुवारी (दि. ३) सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास आठ ते दहा जणांच्या टोळक्याने एका युवकावर हल्ला चढविला. कोयता, हॉकी स्टिक, लाकडी दंडुक्यांनी जबर मारहाण केल्याच्या घटनेने श्रमिकनगरला धावपळ उडाली. या हल्ल्यात अतुल खरे (रा. श्रमिकनगर) हा गंभीर जखमी झाला असून, त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण; काही भागांत हलक्या पावसाची शक्यता

श्रमिकनगर येथील धात्रक चौकातून दुचाकीने श्रमिकनगरच्या दिशेने जाणाऱ्या तिघा युवकांचा एक दुचाकी व रिक्षाद्वारे हल्लेखोर टोळक्याने पाठलाग करत हल्ला चढविला. दोघा दुचाकीस्वारांनी या हल्ल्यातून कसाबसा पळ काढला. मात्र अतुल हा हल्लेखोरांच्या तावडीत सापडला. आठ जणांनी हॉकी स्टिक, स्टम्प व कोयत्याने मारहाण करत गंभीर दुखापत केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या सायकलपटूंनी रॅलीतून दिला 'माझा भारत - माझं मत'चा संदेश

हल्लेखोर फरार: मदतीसाठी धावलेल्या लोकांना कोयता दाखवत त्यांच्या दिशेने उगारत हल्लेखोरांनी घाबरवून दहशत पसरविली. यामुळे परिसरात वर्दळ असूनसुद्धा कोणीही त्यावेळी हल्लेखोरांच्या दिशेने धाव घेण्याचे धाडस केले नाही. घटनेची माहिती पोलिसांना मिळेपर्यंत आणि पोलिस दाखल होईपर्यंत हल्लेखोर फरार झाले होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790