नाशिक (प्रतिनिधी): सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना हेरून आर्थिक गंडा घालणारी टोळ्या अजूनही सक्रिय आहेत. अशाच एका टोळीने मुलासाठी सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या मुलाच्या वडिलांना तब्बल ८ लाखांना गंडा घातला आहे.
संशयितांनी नोकरीच्या नियुक्तीचे बनावटपत्र देत फसवणूक केली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. बाळू दादा जाधव (रा. दुडगाव, ता. जि. नाशिक), मुन्ना सोन्या कुंवर आणि शरद दत्तात्रय राजगुरू ऊर्फ पाटील अशी संशयितांची नावे आहेत.
हेमराज गंगाराम गायकवाड (४८, रा. ताहाराबाद, ता. बागलाण, जि. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, आश्रमशाळेत कार्यरत असून त्यांच्या मुलाने एमएसडब्लू यासह डी. एडपर्यंत शिक्षण घेतलेले आहे. त्यामुळे गायकवाड हे मुलाच्या नोकरीसाठी प्रयत्नशील होते. गेल्या वर्षी १२ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांची सीबीएस येथे संशयितांशी ओळख झाली होती. त्यावेळी संशयितांनी ‘तुमच्या मुलास नोकरी लावून देतो. पण त्यासाठी १२ ते १३ लाख रुपये लागतील.
आस्थापना, टेबल, वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांनीही नोकरीची हमी मिळत असल्याने पैसे देण्यास मान्य केले. त्यानंतर, संशयितांनी संगनमत करीत हेमराज यांच्या मुलाची लिपिक/टंकलेखक पदावर निवड झाल्याचे सांगत मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील वैद्यकीय चाचणीचे पत्रही त्यांना दाखविले होते.
त्यामुळे गायकवाड यांचाही संशयितांवर विश्वास बसला. त्यामुळे त्यांनी संशयितांना ‘गूगल आणि फोन पे’ द्वारे बँक खात्यांवर वेळोवेळी असे ५ लाख रुपये दिले. तर, ३ लाख रुपये रोख दिले. संशयितांनी गायकवाड यांच्या मुलास सिन्नर तहसील कार्यालयात लिपिक व टंकलेखक या पदावरील नियुक्तीचे बनावट पत्र दिले. प्रत्यक्षात जेव्हा त्यांचा मुलगा रुजू होण्यासाठी गेला त्यावेळी ते पत्रच बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २९९/२०२४)