नाशिक (प्रतिनिधी): पंतप्रधान कार्यालयातून सचिव बोलत असल्याचे भासवून नाशिकमधील आमदारास भाजपकडून अधिकृत एबी फॉर्म कन्फर्म करुन देण्याचे सांगून ५० लाख रुपये न दिल्यास बदनामीची धमकी देणाऱ्या परप्रांतीय सराईतांचा ताबा नाशिक पोलिसांनी दिल्ली पोलिसांकडून घेत त्यांना नाशकात आणले आहे.
गुन्हेशाखा युनिट एकने ही कारवाई केली असून गेल्या आठवड्यात फसवणुकीचा हा प्रकार नाशिकमध्ये घडला होता. संशयितांनी दोघांनी जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांना फोन करून पैशांची मागणी केली होती.
सर्वेश सुरेंद्र मिश्रा उर्फ शिवा उर्फ दिनू (रा. गाजियाबाद, उत्तरप्रदेश) व गौरव नाथ बहादुर सिंग नाथ (रा. दिल्ली) अशी संशयितांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके व गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका आमदारास ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस दिल्ली येथून फोन आला होता. त्याने पीएमओ कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत आपण प्रधान सचिव बोलत असल्याचे सांगितले. तुमचे विधानसभेचे तिकीट रद्द केल्याचे सांगत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र वाचून दाखवले.
तसेच तुम्हाला विधानसभेचे तिकीट हवे असल्यास ५० लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. पैसे न दिल्यास पक्षाकडून तिकीट मिळाले तरी राज्यात बदनामी केली जाईल अशी धमकी दिली. त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात खंडणीची फिर्याद दाखल केली. पथकाने दिल्लीत जाऊन तपास केला असता संशयितांविरोधात दिल्ली येथेही खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे समजले. तसेच ते दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समजले.