
नाशिक (प्रतिनिधी): अवैध सावकारी व्यवसाय करणारा सराईत गुन्हेगार वैभव देवरे याच्यावर आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिकृत प्रेसनोट जारी केली आहे. वैभव देवरेच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी वैभव देवरेसह त्याची पत्नी आणि शालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मयत इसमाच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि फिर्यादी यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी यांचे पती धिरज विजय पवार रा. सहदेवनगर, गंगापुर रोड, नाशिक यांचा डी. एस.पी. बासुंदी चहा नावाने नाशिक जिल्हयामध्ये व्यवसाय असुन नाशिक शहर व परिसरात डी.एस.पी. बासुंदी चहा नावाने अनेक शाखा आहेत.
फिर्यादी यांचे पती यांना चहाच्या व्यवसायाकरीता पैशांची गरज असल्याने वैभव देवरे (रा. चेतनानगर, राणेनगर नाशिक) यांच्याकडून १२ लाख रूपये प्रतिमहिना टक्केवारीवर व्याजाने पैसे घेतले होते व घेतलेल्या कर्जापोटी होणा-या व्यवसायातुन ते परतफेकड करत होते. परंतु काही दिवसानंतर सराईत गुन्हेगार वैभव देवरे हा मुळ रकमेच्या व्याजाच्या वसुलीसाठी धिरज विजय पवार यांना दमदाटी करू लागला. फिर्यादी यांचे पती यांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीवेळी व्याजाचे पैसे देण्यास जितका उशीर झाला त्या प्रत्येक दिवसाला महिन्याला जे व्याज होईल तेवढा दंड आकारत असे.
फिर्यादी यांचे पती धीरज पवार यांना ऑगस्ट २०२४ मध्ये व्यवसायामध्ये अडचण निर्माण झाल्याने ते वैभव देवरे याला पैसे देऊ शकत नव्हते. त्यामुळे वैभव देवरे याने धिरज पवार यांना फोन करून कुंटुबीयांना जिवे मारण्याची धमकी देवुन वैभव देवरे व त्याचा शालक निखील पवार हे फिर्यादी यांच्या घरी जावुन धिरज विजय पवार यांचेकडे घरातील सोन्याच्या दागिन्यांची मागणी करून तसेच त्यांच्या गावाकडील शेतजमिन स्वतःच्या नावावर करण्यास सांगितले. याला धीरज पवार यांनी नकार दिला असता मारहाण व जिवे मारण्याचा प्रयत्न करून त्यांच्याकडून को-या कागदावर व चेकवर सहया करून घेतल्या होत्या.
फिर्यादी यांचे पती धिरज पवार यांनी वैभव देवरे यांचेकडुन घेतेलेल्या १२ लाख रुपये कर्जापोटी तब्बल ३२,४०,००० रुपयांची परतफेड केली असतांना रात्री बेरात्री वैभव देवरे हा व्याजापोटी अतिरिक्त पैशांची मागणी करत असे. पैसे दिले नाहीतर कुटुंबियांना मारण्याची धमकी देवु लागल्याने धिरज पवार हे मानसिक तणावात होते. दिनांक १५ ऑकटोबर २०२४ रोजी मित्रास भेटावयास जातो असे सांगुन ते घरातुन निघुन जावुन अवैध सावकारी करणारे वैभव देवरे याचे जाचाला कंटाळुन त्यांनी नांदुरी घाटामधील जंगलामध्ये आत्महत्या केली.
घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने फिर्यादी यांनी दिनांक आज दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी गंगापुर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गंगापुर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर २५६/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०८, १०९(१), ३०८(२), ३०८(३), ६१(१) (२) सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९, ४५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हेशाखेकडील अधिकारी करीत आहेत.
गंगापुर पो.स्टे. कडील दाखल गुन्हयाचे तपासात सराईत गुन्हेगार वैभव देवरे व त्याची पत्नी सोनाली देवरे रा. चेतनानगर इंदिरानगर नाशिक व शालक निखील पवार रा. राणेनगर नाशिक यांचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने मध्यवर्ती गुन्हेशाखेकडील तपास पथक हे गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेत असतांना सोनाली देवरे रा. चेतनानगर व निखील पवार (रा. राणेनगर) हे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांची ४ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली असुन, गुन्हयातील मुख्य आरोपी वैभव देवरे हा फरार झाला असुन गुन्हेशाखेकडील तपास पथके त्याचा शोध घेत आहेत.
अवैध सावकारी करणारे इसम वैभव देवरे त्याची पत्नी व शालक निखील पवार यांचे विरूध्द आत्महत्येस प्रवृत्त करणे, खुनाचा प्रयत्न करणे, फौजदारी कट, खंडणी, जबरी चोरी, गृह अतिक्रमण, खुन करण्यासाठी अपहरण करणे, खंडणी वसुलीसाठी दुखापत करणे, विनयभंग, संगनमत करून धाकदडपशाही करणे, शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
आरोपी वैभव देवरे हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर वरीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी हे ज्या इसमांना पैशांची अडचण आहे, व्यवसायामध्ये आर्थिक नुकसान झालेले आहे अशा इसमांना हेरून त्यांना कर्जाचे आमिष दाखवुन त्यापोटी दामदुप्पट व्याज वसुल करतात. व्याजापोटी रक्कम दिली नाहीतर शिवीगाळ, मारहाण, जिवे मारण्याची धमकी देवुन इतर स्थावर व जंगम मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत.
![]()


