नाशिक (प्रतिनिधी): शहरात कत्तलीसाठी गोवंशांची तस्करी केली जात असल्याची खबर मिळताच शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने पेठरोडवर कारवाई करीत चार गोवंशीय जनावरांची सुटक केली.
याप्रकरणी एकाला अटक केली असून म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. गुंडाविरोधी पथकाला पेठरोडने नाशिकमध्ये कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे आणली जात असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने गुरुवारी (ता.१९) पहाटेच्या सुमारास पेठरोडवरील तवली फाटा येथे सापळा रचून दबा धरलेला होता.
पहाटेच्या सुारास संशयित वाहन (एमएच १५ इजी ३०८५) येताना दिसता, पथकाने ते रोखले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये कत्तलीसाठी नेली जात असलेली चार गोवंशीय जातीच्या गायी होत्या. संशयित चालक इरफान नूर कुरेशी (वय: २७, रा. काळे चौक, मोठा राजवाडा, वडाळागाव) यास अटक केली. तर वाहनमालक समीर पठाण (रा सादीकनगर, वडाळागाव) व कत्तलीसाठी सदरील जनावरे खरेदी करणारे संशयित मन्नन कुरेशी (रा. नानावली), शालम चौधरी, आवेश कुरेशी (रा. बागवानपुरा, जुने नाशिक) हे संशयित फरार झाले आहेत.
गोवंश गायींना गोशाळेत सोडले आहे. जनावरे व वाहन असा ४ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, दिलीप सगळे, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे यांच्या पथकाने केली.