नाशिक (प्रतिनिधी): सातत्याने धडक कारवाई सुरु असूनही शहर परिसरात नायलॉन मांजा विक्रीचा प्रयत्न सुरुच आहे. शुक्रवारी (ता.२७) पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अमृतधाम परिसरात मांजा विक्रीच्या तयारीतील अल्पवयीन मुलावर कारवाई करत ताब्यात घेतले.
त्याच्या ताब्यातून ३३ हजार ९५० रुपये किमतीचा ४९ नग नायलॉन मांजा जप्त केला आहे. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा वापरावर बंदी असल्याने असा मांजा विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यानुसार शुक्रवारी (ता.२७) अमृतधाम भागातील गजानन रो-बंगलोच्या भिंती लगत बंदी असलेला नायलॉन मांजा विक्रीसाठी संशयित येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने कारवाई केली. पोलिस हवालदार दीपक नाईक, कैलास शिंदे, नीलेश भोईर, शिपाई वैभव परदेशी, युवराज गायकवाड, घनशाम महाले, रोहिणी भोईर यांनी सापळा रचून विधी संघर्षीत बालकाला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून ३३ हजार ९५० रुपये किमतीचे एकूण ४९ नग नायलॉन मांजा जप्त केला आहे. यापुढेही कारवाई सुरुच राहणार आहे. त्यामुळे प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजाची विक्री, खरेदी करू नये. अन्यथा पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.