नाशिक (प्रतिनिधी): गोल्फ क्लब येथील जॉगिंग ट्रक येथे अश्लील कृत्य करणाऱ्या जोडप्यास दाम्पत्याने हटकल्याने संतप्त होत युवकाने एकाच्या डोक्यात वीट मारून दुखापत केल्याची संतापजनक घटना सोमवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास घडली. मुंबईनाका पोलिसांनी तातडीने तपास करीत संशयित युवकास पकडले. त्याच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गेल्या आठवड्यात मद्यसेवन करून लाकडी दांडे, फावडे घेऊन तरुणांनी गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅकवर धुमाकूळ घातला होता. नागरिकांना मारहाण करीत, धमकावत लूटमार करून या तरुणांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांची धरपकड केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २६) गणेश रघुनाथ डोके (५२, जुने नाशिक) हे जॉगिंग ट्रॅकवर फिरत होते. त्यावेळी तेथे आडोशाला एक प्रेमीयुगल अश्लील कृत्य करतांना दिसले. त्यामुळे डोके यांनी त्यांची समजूत काढून तेथून जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने संशयित संतोष सोमा हिरवे (२१, रा. फुलेनगर) याने गणेश डोके यांना वीट फेकून मारली.
डोक्यास वीट लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच मुंबईनाकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष नरुटे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपास करीत संशयितास पकडले. तर डोके यांना रुग्णालयात दाखल केले. डोके यांच्या फिर्यादीनुसार, मुंबईनाका पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २४६/२०२४)
दामिनी पथकानेही हटकलेले:
सूत्रांच्या माहितीनुसार, घटनेच्या काही वेळेआधीच या प्रेमीयुगलास दामिनी पथकाने समज दिली होती. तसेच जॉगिंग ट्रॅकवरून निघून जाण्यास सांगितले होते. मात्र दामिनी पथक गेल्यानंतर हे प्रेमीयुगल पुन्हा तेथे आले व अश्लील कृत्य करत होते.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790