नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड परिसरामध्ये अज्ञात चोरट्यांनी एकाच दिवशी तीन घरफोड्या करीत सुमारे पाच लाखांचे सोन्याचे दागिने व रोकड असा ऐवज लंपास केला आहे. यातील दोन घरफोड्या या भरदिवसा झाल्याने पोलिस गस्ती काय कामाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गंगापाडळी येथे बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ५५ हजारांचे दागिने व रोकड चोरून नेत घरफोडी केली.
विठाबाई बाजीराव वलवे (रा. गंगापाडळी, ता. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता.२३) सकाळी साडेअकरा ते सायंकाळी ७ या वेळेत अज्ञात संशयिताने बंद घराचे कडीकोयंडा तोडून सोन्याचे दागिने व रोकड असा २ लाख ५५ हजारांची ऐवज चोरून नेत घरफोडी केली. तर, चाडेगाव फाटा येथील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने १ लाख १२ हजार ३०० रुपयांचे दागिने व रोकड चोरून नेत घरफोडी केली.
शांताराम विष्णू मानकर (रा. चाडेगाव फाटा, सामनगाव) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता. २३) सकाळी ११ ते दुपारी एक यावेळेत त्यांच्या बंद घराची घरफोडी झाली. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी हे करीत आहेत. तसेच, चेहडी पंपींग येथील विजयनगरमध्ये बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख २१ हजारांचे सोन्याचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून नेत घरफोडी केली.
विजय बाबुराव भामरे (रा. कौशल्य निवास, विजयनगर, चेहडी पंपींग) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता. २३) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सदरची घरफोडी करीत घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून नेत घरफोडी केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक शिंदे हे तपास करीत आहेत.