नाशिक (प्रतिनिधी): राजीव गांधी भवन परिसरात अनेक खासगी कंपन्यांचे कार्यालय आहेत. अशाच एका खासगी लाईफ इन्श्युरन्स कंपनीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
कार्यालयातील मॅनेजरने आपल्याच सहकारी महिलेचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार, मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यवस्थापकाने सहकारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीस खासगी फोटो दाखविण्याची धमकी देत संशयिताने पीडितेस मारहाणही केली अशी फिर्याद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल कारभारी जाधव (रा. जेलरोड) असे संशयित व्यवस्थापकाचे नाव आहे. संशयित आणि पीडिता राजीव गांधी भवन परिसरातील एका लाईफ इन्श्युरन्स कंपनीत कार्यरत आहेत. बुधवारी (दि.२२) सकाळच्या सुमारास पीडिता नेहमीप्रमाणे कार्यालयात काम करीत असतांना संशयिताने तिला गाठले.
पीडिता विवाहीत असल्याचे माहित असूनही संशयिताने तुम्हाला करिअर कसे करायचे हे शिकवून देईल अशी बतावणी करीत महिलेचा विनयभंग केला.
यावेळी महिलेने त्यास खडसावण्याचा प्रयत्न केला असता, संशयिताने दोघांचा एकत्रीत फोटो पतीस दाखविण्याची धमकी देत तिला शिवीगाळ व मारहाण केली. त्यामुळे महिलेने पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरनार करीत आहेत.