नाशिक। दि. १८ जून २०२५: भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन व जन्मतः गतिमंद असलेल्या मुलाच्या अज्ञानपणाचा फायदा घेत दोघा आरोपींनी गोदाकाठी त्याला घेऊन जात अनैसर्गिकरीत्या लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. भद्रकाली पोलिसांनी संशयित जावेद ऊर्फ अल्लू बशीर (२०), साहिल राजू शहा (२४) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
जुने नाशिकमधील एकागतिमंद मुलाच्या अजाणतेपणाचा गैरफायदा संशयित दोघा युवकांनी उचलून त्याच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची घटना गेल्या आठवड्यात (दि.९) घडली होती. हा मुलगा जेव्हा घरी आला तेव्हा त्याला व्यवस्थितपणे चालता येत नव्हते. यामुळे पालकांना संशय आला व त्यांनी त्यास विश्वासात घेऊन विचारले असता त्याने वेदना होत असल्याचे सांगितले. यानंतर त्यास उलट्यांचाही त्रास सुरू झाला. पालकांनी त्यास दवाखान्यात हलविले. दोन दिवस त्यास दवाखान्यात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याच्यासोबत गैरकृत्य झाल्याचे पालकांना सांगितले. हे ऐकून पालकांना मोठा धक्का बसला. त्यांनी भद्रकाली पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.
अत्याचाराचा व्हिडीओ मोबाइलवर पाठविला:
मुलावर केलेल्या अनैसर्गिक शारीरिक अत्याचाराचा व्हिडीओ मोबाइलने चित्रित केला होता. हा व्हिडीओ एका मोबाइल क्रमांकावरून अनोळखी इसमाने रविवारी (दि.१५) दुपारी मुलाच्या पालकांच्या मोबाइल क्रमांकावरसुद्धा पाठविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790