नाशिक (प्रतिनिधी): दुचाकीने जाणाऱ्या कुरिअर कर्मचाऱ्याचा दुसऱ्या दुचाकीवरील तिघांनी पाठलाग करत पाठीमागून धडक देऊन त्याच्या दुचाकीसह डिक्कीतील साडे १६ लाख रुपये इतकी रक्कम लुटली. नाशिक-पुणेरोडवर रात्री ८ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि हितेंद्रकुमार पटेल (रा. पंचवटी कारंजा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कुरिअरचे काम करणारे पटेल त्यांचे मित्र योगेश यांच्यासह सायंकाळी ७ च्या सुमारास नाशिकरोडहनू पंचवटीकडे जात होते. त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत विविध ग्राहक आणि एजन्सीकडून कलेक्शन केलेली रक्कम होती. मात्र नासर्डी पुलावरून जात असता पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी थांबा, थांबा असा आवाज दिला. पटेल यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असता संशयितांनी दुचाकीला पाठीमागून धडक दिली.
पटेल आणि योगेश दोघे दुचाकीसह खाली पडले. संशयित खाली उतरले. दोघांच्या दिशेने धाव घेतल्याने पटेल भीतीपोटी दुचाकी सोडून बाजूला पळाले. संशयितांनी दुचाकीसह रक्कम लुटून नेली. संशयितांनी कुरिअर कामगारांवर पाळत ठेवत लूट केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (मुंबई नाका पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४८/२०२५)