नाशिक (प्रतिनिधी): जेल रोड भागातून उपनगर पोलिसांनी सापळा रचून तिघा संशयित युवकांना नायलॉन मांजा विक्री करताना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ८० हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे १०१ गट्ठ जप्त करण्यात आले आहे.
संक्रात सण महिनाभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी विविध प्रकारच्या पतंग व मांजा दाखल झाला आहे. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर हा सर्वांसाठी घातक ठरत असल्याने पोलिस आयुक्तालयाकडून विक्री, साठा व वापरावर बंदी घातली आहे.
उपनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध शाखेचे पोलिस गौरव गवळी यांना जेलरोड सैलानीबाबा चौकाजवळ नायलॉन मांजाचे गट्ठ विक्रीसाठी आणणार असल्याची गोपनीय माहिती रविवारी दुपारी मिळाली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, हवालदार इम्रान शेख, अनिल शिंदे यांनी लागलीच सैलानी बाबा चौकाजवळील गणपती मंदिरानजीक सापळा रचून संशयास्पद वावरणा-या प्रज्वल सुरेश गुंजाळ (रा. मोरे मळा, जेलरोड) याला पकडले. त्याच्या जवळील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये दोन नायलॉन मांजाचे गट्ठ मिळाले. हे गद्व यश लक्ष्मण कांगणे (रा. अष्टविनायक नगर, शिवाजीनगर, जेलरोड), शुभम अजित गुजर (भगवा चौक, जेलरोड) यांच्याकडून घेतल्याची कबुली गुंजाळने दिली.