नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): जेलरोड परिसरातील भीमनगर येथे भाड्याची खोली खाली करण्यास सांगितल्याच्या रागातून संशयिताने एकाला मारहाण केल्यानंतर पुन्हा कोयता घेऊन आला आणि ७० वर्षीय वृद्धावर वार करून त्यांना दुखापत केल्याचा प्रकार घडला.
सोनू बेद असे संशयिताचे नाव आहे. उत्तम यशवंत पठारे (रा. धीरज अपार्टमेंट, भीमनगर, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, पठारे यांचा मुलगा किरण याने बाळा जाधव यांची खोली संशयित सोनू यास भाड्याने दिली होती. वर्ष झाल्याने जाधव यांनी संशयित सोनू यास खोली रिकामी करण्यास सांगितले असताही त्याने केली नव्हती. त्यामुळे जाधव याने किरण पठारे यास सांगितले.
त्यानुसार, किरण यांनी रविवारी (ता.५) रात्री अकराच्या सुमारास सोनूची भेट घेतली. त्यावेळी त्यास खोली रिकामी करण्यास सांगितले. त्याचा राग येऊन त्याने किरण यांना मारहाण केली. याप्रकरणी किरण तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता, संशयित सोनू त्यांच्या घरी कोयता घेऊन पुन्हा गेला. त्यावेळी त्याने किरण यांचे वडील उत्तम पठारे यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. याप्रकरणी उपनगर पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १७०/२०२४)