नाशिक: अपहरणासह प्राणघातक हल्ल्यातील फरार आरोपी तब्बल तीन वर्षांनंतर जाळ्यात !

नाशिक (प्रतिनिधी): पूर्ववैमनस्यातून तरुणाचे अपहरण करुन त्याला जबर मारहाण करुन पळ काढलेल्या सराईतास अखेर तीन वर्षांनी गजाआड करण्यात गुंडाविरोधी पथकास यश आले आहे. रविंद्र उर्फ दादू पोपट डोलनर (वय ३८, रा. वज्रेश्वरी नगर, पंचवटी) असे संशयिताचे नाव असून तो गुन्हा केल्यापासून तब्बल अडीच ते तीन वर्षांपासून परागंदा होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या (दि. २६) विविध कार्यक्रमांचे आयोजन

५ जून २०२२ रोजी रात्री कुणाल थोरात या तरुणाला सहा ते सात संशयितांनी पंचवटीतून अपहरण करुन वज्रेश्वरी नगर झोपडप‌ट्टीच्या मैदानात आणत पूर्ववैमनस्यातुन कुरापत काढुन दांडके व दगडाने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करुन गंभीर जखमी केले होते. यानंतर सर्वच संशयित पळून गेले होते. पंचवटी पोलीसांनी गुन्हा दाखल करुन पाच जणांना अटक केली होती. मात्र, मुख्य सूत्रधार डोलनर हा तेव्हापासून पसार होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडा विरोधी पथकास सराईत व पसार संशयितांना पकडण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार पथकाचे अंमलदार राजेश राठोड यांना डोलनर याची माहिती मिळाली. डोलनर हा दोन ते अडीच वर्षांपासून स्वतःची ओळख लपवून कर्नाटक, गुजरात या राज्यांत वास्तव्य करत होता. तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती मिळताच गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथकाने आहिल्यानगरातील राहुरी येथे रवाना होत येथील कॉलेज रोडजवळील चव्हाण वस्ती येथे सापळा रचून डोलनर याला ताब्यात घेतले. त्याचा ताबा पंचवटी पोलीसांकडे देण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790