नाशिक (प्रतिनिधी): अशोका मार्ग परिसरातील खोडेनगर येथून पानटपरी चालकाच्या घर आणि कारमधून तब्बल साडेसहा लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने एकाला अटक केली असून, मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
इम्तियाज जाफर तांबोळी (वय ३८, रा. मज्जिते हसन, श्रीकृष्ण अपार्टमेंट शेजारी, अशोका मार्ग, खोडेनगर) असे संशयिताचे नाव आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी अमली पदार्थविरोधी पथकास गांजा, एमडी ड्रग्ज, गुटखा व तत्सम पदार्थांच्या तस्करी, विक्रीवर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
पथकाच्या वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे यांना संशयित तांबोळीकडे अवैध गुटख्याचा साठा असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, पथकाने शनिवारी (ता. १६) रात्री अशोका मार्गावरील त्याच्या घराच्या पार्किंगमधील कारसह घरावर छापा टाकला. गुटख्याची पाकिटे कारमध्ये आढळली, तर जास्तीचा साठा घरात दडविल्याचे आढळले. कारसह (एमएच ०५ बीएल २०४०) दोन लाख २९ हजार १२ रुपयांच्या प्रतिबंधित गुटख्यासह एकूण सहा लाख २९ हजार १२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.