नाशिक (प्रतिनिधी): साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकमध्ये शुक्रवारी (दि. ६) पहाटे तीन वाजता सापळा रचून एमडी ड्रग्ज विक्रीचे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले होते. चोरीछुपे आलेल्या चौघांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीचे ६१.५ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले होते.
गुन्ह्यातील पाचवा आरोपी सदाशिव ऊर्फ शिव पाराजी गायकवाड (३४, रा. म्हाडा), वडाळागाव यास गुरुवारी (दि. १२) बेड्या ठोकण्यात आल्या. गायकवाड हा सराईत गुन्हेगार आहे. अजय भिका राधकर, अल्ताफ पीरण शहा, मोहसीन हानिफ शेख, आकर्षण रमेश श्रीश्रीमाळ या चार संशयितांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती.
पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज (दि. १३) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गायकवाडवर इंदिरानगर पोलिस ठाण्यात दोन, तर भद्रकाली, उपनगर, घोटी पोलिस ठाण्यात प्रत्येक एक असे सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वडाळा परिसरात त्याची दहशत असून, एमडी ड्रग्जच्या सप्लायर चेनचा तो मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे. त्याच्याकडून अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
![]()


