नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पोलिस ठाण्यांकडून बुधवारी (दि.३१) मोहीम राबविली जात होती. यावेळी इंदिरानगरच्या रथचक्र चौकात दुचाकीस्वारांना अडविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असता त्यांनी तेथून पळ काढला. यावेळी गुन्हे शोधपथकाने त्यांचा पाठलाग करून रोखले. दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोनसाखळ्या आढळून आल्या.
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ‘स्टॉप अॅन्ड सर्च’ मोहीम राबविण्याच्या आदेश दिले आहेत. यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या सूचनेवरून इंदिरानगर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोधक पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील अंकुलीकर, सागर परदेशी, मुश्रीफ शेख, योगेश जाधव, प्रकाश नागरे, सागर कोळी, जयलाल राठोड यांचे पथक रात्री साडेआठ वाजता रथचक्र चौकात स्टॉप अॅन्ड सर्च मोहीम सुरू केली होती.
यावेळी संशयास्पद वाहनचालकांना थांबवून तपासणी केली जात असताना पळून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळ काढला. पोलिसांचा संशय बळावल्यामुळे त्यांनी पाठलाग सुरू केला. सोनसाखळी चोरी करणारे संशयित निशांत हंडोरे (२५), परवेज मणियार (२६, दोघे रा. शिवाजीनगर, सातपूर) यांच्याकडून चोरीच्या दोन सोनसाखळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. दरम्यान, स्टॉप अन् सर्च मोहिमेअंतर्गत १६२ कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच ३६ टवाळखोरांवरही कारवाई करण्यात आली आहे.
बुधवारी केली होती चेनस्नॅचिंग:
राणे नगर येथे सुमारे एक लाखाची व रथचक्र चौकाच्या परिसरातून दुसऱ्या महिलेची सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून संशयित दुचाकीचोर पसार होत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. हे दोन्हीही सराईत चोर असून त्यांच्याकडून अजून सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांनी वर्तविली आहे.