
नाशिक (प्रतिनिधी): अंबड एमआयडीसीतील एका कंपनीचे गोदाम फोडून कॉपर केबल चोरी करणारी पाच जणांची टोळी जेरबंद करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अशोकनगर, सातपूर येथे ही कारवाई केली. सुखदेव झोले, योगेश मरळ, संजय सकट, प्रमोद म्हस्के, कृष्णा वाकळे असे या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असतांना पथकाचे यशवंत बेंडकोळी, प्रकाश महाजन यांना डी. एस. केबल अँड स्वीच गिअर कंपनीच्या गोदामातून कॉपर वायरच्या बंडलची चोरी झोले, मरळ व त्यांच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. पथकाने दोघांवर पाळत ठेवली. दोघे दुचाकीने प्रगती शाळा, अशोकनगर येथे आले. दोघांना ताब्यात घेतले. संशयितांची चौकशी केली असता वाकळे, मरळ, काशिद यांच्या साथीने चोरी केल्याचे सांगत एमएच १५ जेए ४६५१ या क्रमांकाच्या रिक्षातून पिंपळद येथे वायर जाळून कॉपर वायर भंगार व्यावसायिक संजय सकट याला विक्री केल्याची माहिती दिली. संशयितांकडून एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, मनोहर शिंदे, सुनिल आहिरे, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.