
नाशिक | दि. २३ डिसेंबर २०२५: दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने राबविलेल्या सापळा कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या आठ दुचाकींसह सहा मोबाइल फोन असा एकूण सुमारे ४ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अंबड पोलिस ठाणे हद्दीत शनिवारी (दि. २०) प्रवीण अशीर (वय: ३१) यांची दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकातील अंमलदार अनिल गाढवे, प्रवीण राठोड व तुषार मते यांना चोरीची दुचाकी विक्रीसाठी एक इसम येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांना कळविण्यात आली, त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तात्काळ रवाना करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुल परिसरात साध्या वेशात सापळा रचण्यात आला. त्या ठिकाणी संशयित रितेश भगवान सुबर (वय १९, रा. अशोकस्तंभ) व योगेश गणपत लहानगे (वय १९, रा. गौळाणे) हे दोघे आले असता पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असल्याची कबुली त्यांनी दिली.
पोलिस ठाण्यात करण्यात आलेल्या सखोल चौकशीत सातपूर परिसरातील चार व अंबड परिसरातील एक असे एकूण पाच दुचाकी चोरीचे गुन्हे त्यांनी केल्याचे उघड झाले. संशयितांकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या आठ दुचाकी व सहा मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत.
![]()

