
नाशिक। दि. १८ डिसेंबर २०२५: शहरात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विक्रीवर कडक बंदी असतानाही चोरट्या मार्गाने विक्री सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पवननगर भागात अंबड गुन्हे शाखेने सापळा रचून १ लाख २१ हजार ८०० रुपये किमतीचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला असून, एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.
पवननगर भागात नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पथकाने सायंकाळी ७.३० वाजता येथे छापा टाकला. संशयित आकाश किशन राठोड (वय: १८ वर्षे, रा. पाथर्डी फाटा) याच्याकडे नायलॉन मांजाचे मोठ्या आकारातील १४४ गट्टू मिळून आले. सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सगळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षिरसागर, पोलीस हवालदार परमेश्वर दराडे, प्रकाश बोडके, पोलीस नाईक: भुषण सोनवणे, पोलीस अंमलदार भगवान जाधव, चारूदत्त निकम व महिला पोलीस अंमलदार सविता कदम यांच्या पथकाने केली.
![]()

