नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी परिसरातील नरोत्तंमभवन समोर रस्त्यावर मार्केट यार्डात हमाली करणाऱ्या युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना मंगळवार ता.१० रोजी मध्यरात्री सुमारास घडली होती.
या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता. अतुल सूर्यवंशी (वय 30,रा.पेठ रोड, पंचवटी नाशिक) असे मयताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पेठ रोडवरील राहणाऱ्या बत्तीस वर्षीय अतुल सूर्यवंशी हा मार्केट यार्ड येथे आपल्या मोठ्या भावा कडे हमालीचा काम करत होता. याप्रकरणी पोलिसांनी ताबडतोब तपासाची चक्रे फिरविली.
या प्रकरणाच्या तपासासाठी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हयातील संशयितांना शोध घेण्याकरीता पंचवटी पोलीस स्टेशन कडील पथके रवाना करण्यात आली होती. सदर गुन्हयातील संशयितांचा शोध घेत असतांना, पंचवटी पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाने गुन्हयात वापरलेल्या वाहनाबाबत माहिती काढून त्याच्या आधारे इसम नामे हितेश जगन्नाथ वाघ (वय ३२ वर्षे, राह. फ्लॅट नं. ०६, राजपाल कॉम्प्लेक्स, पेठफाटा, पंचवटी, नाशिक) यास ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल चौकशी केली असता, त्याने सदर गुन्हयाची कबुली देऊन सदरचा गुन्हा प्रविण उर्फ बादल पवन वाघ (वय २३ वर्षे, राह. एरंडवाडी, पेठफाटा, पंचवटी, नाशिक) याच्या मदतीने केल्याची कबुली दिली.
त्यानंतर पंचवटी गुन्हे शोध पथकास तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने बादल वाघ हा धुळयाला असल्याचे समजले. परंतु, तो प्रवासात असल्याने त्याचे ठिकाण सातत्याने बदलत असल्याने पोलीस पथक रात्रभर त्याच्या मागावर होते. पोलीस पथक त्याच्या मागावर असतांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बादल वाघ हा वडाळी भोई ते सोग्रस फाटयाच्या दरम्यान स्थिरावल्याचे समजताच पथकाने कौशल्यपुर्ण रितीने सापळा लावून पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेतले.
त्याचेकडे सदर गुन्हयाबाबत अधिक सखोल तपास करता, मयत अतुल अशोक सुर्यवंशी व संशयीतांमध्ये झालेल्या तात्कालीन भांडणावरून बादल वाघ व हितेश वाघ यांनी अतुल सुर्यवंशी याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉकने मारून त्यास जिवे ठार मारल्याची कबुली दिली आहे. पंचवटी पोलिसांनी अवघ्या १२ तासाच्या आत या गुन्ह्याचा छडा लावला !