
नाशिक (प्रतिनिधी): ठक्कर बाजार येथून लॉज पाहण्यासाठी रिक्षात बसलेल्या कॅनडाच्या प्रवाशाला रिक्षाचालकाने लुटले होते. गळ्यातील सोन्याची चेन, पॅन्डल व अंगठी तसेच मोबाईल फोन चोरणाऱ्या या रिक्षाचालकास बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्याकडून १ लाख २० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
२९ मे या दिवशी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी कॅनेडियन प्रवासी ठक्कर बाजार येथून एम.एच १५-ई.एच-७२७२ या रिक्षात बसले. ते दारूच्या नशेत असल्याचा रिक्षाचालकाने गैरफायदा घेतला. उपनगर नाका सिग्नल येथे रिक्षा थांबवून फिर्यादीच्या गळ्यातील दागिने व मोबाईल बळजबरीने चोरी करून फिर्यादीला रस्त्यावरच सोडून रिक्षाचालकाने धूम ठोकली.
याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा परदेशी नागरिकासंबंधी तसेच अतिशय संवेदनशील असल्याने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संशयित रिक्षाचालकाचा शोध घेण्याची सूचना केली. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ चे अधिकारी व अंमलदार असे या गुन्ह्याचा तपास करीत असताना संशयित आरोपी तथा रिक्षाचालक जगदिश दादाजी कापडणीस (वय ४२, रा. काकुचा बाग, संगमेश्वर मालेगाव) हा शिर्डी येथून नाशिककडे येत असल्याची माहिती मिळाली. नाशिक ते शिर्डी महामार्गावरील पांगरी गाव येथे रिक्षा अडवून कापडणीस यास ताब्यात घेण्यात आले.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार महेश साळुंके, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, राम बर्डे, पोलीस हवालदार उत्तम पवार, रमेश कोळी, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार यांनी केली आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790