
नाशिक (प्रतिनिधी): शहरात ‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोष सुरु असताना उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर भागात एका सराईत गुन्हेगाराचा त्याच्याच सराईत गुन्हेगार मित्रांनी डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना मंगळवारी (दि. ११) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. लक्ष्मण गारे (३४, रा. क्रांतीनगर) असे मृताचे नाव आहे.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत नव्या वर्षाच्या स्वागताची धामधूम सुरू असताना शहरातील मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली होती. दिलेल्या फिर्यादीप्रमाणे लक्ष्मण हा घरी असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास संशयित गणेश नितीन भावसार व रिझवान काझी (दोघे रा. क्रांतीनगर) यांनी त्याला सोबत नेले. ‘थर्टी फर्स्ट’ची पार्टी करू असे सांगून त्याला उंटवाडी रोडवरील मोकळ्या मैदानात घेऊन ते आले. उंटवाडी रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात मद्यप्राशन करण्यासाठी आलेल्यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून कुरापत काढून शिवीगाळ केली व लक्ष्मणच्या डोक्यात दगड टाकला.
यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या हल्ल्यानंतर हल्लेखोर दुचाकीने फरार झाले. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. गुन्हे शाखेची पथके संशयितांच्या मागावर रवाना झाली.
याप्रकरणी मृताच्या चुलत भावाने मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा जलद गतीने तपास करत असतांना पोलीस हवालदार प्रशांत मरकड व विशाल काठे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, या प्रकरणातील आरोपी शुभम मिरके व त्याचे साथीदार फुलेनगर (पेठ रोड) भागात येणार आहेत.
त्यानंतर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट १ ने दोन पथके तयार करून सापळा रचला. पेठ रोड भागात आरोपींचा शोध घेत असतांना शुभम विठ्ठल मिरके (वय: २१, रा. क्रांती नगर, उंटवाडी रोड), अरुण बापू वळवी (वय: २१, क्रांती नगर, उंटवाडी रोड) आणि रिझवान रईसउद्दीन काझी (वय: २९, रा. क्रांती नगर, उंटवाडी रोड) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा खून त्यांचा साथीदार गणेश भावसार याच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे ) संदिप मिटके,यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क. १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, प्रदिप म्हसदे, शरद सोनवणे, नाझीम पठाण, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, रोहीदास लिलके, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, राहुल पालखेडे, नितीन जगताप, विलास चारोस्कर, राम बर्डे, चालक पवार, समाधान पवार, अनुजा येलवे, यांच्या पथकाने संयुक्त रित्या केलेली आहे.