नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरातून हायवा डंपर पळवून नेणाऱ्या दोघांना डंपरसह ताब्यात घेण्यात गुन्हे शाखेला यश आले असून मध्यप्रदेश व परभणी येथून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आडगाव परिसरातून हा हायवा पंधरा दिवसांपूर्वी चोरीला गेला होता.
गुन्हे शाखा युनिट १ चे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तसेच पोलिस अंमलदार राहुल पालखेडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हा जिल्हा पन्ना (मध्यप्रदेश) येथे असल्याबाबत माहिती मिळवली होती. सदरची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी तपासासाठी पथक रवाना केले.
पन्ना येथे पोहोचल्यानंतर त्यांनी आरोपी संतोष ऊर्फ बसंत राजपूर (राठोड), (रा. इमलिया, ता. शहापूर, जि. पन्ना, मध्यप्रदेश) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेला हायवा ट्रक परभणी येथील हुजून सैयद याच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानुसार संतोष याला सोबत घेत पोलिसांनी परभणी येथे जात त्याचा साथीदार सैयद यालाही ताब्यात घेतले. तसेच त्याच्या ताब्यातून हायवा डंपर ताब्यात घेतला.