नाशिक (प्रतिनिधी): टिप्पर टोळीच्या नावाखाली सिडको, पंचवटीत दहशत माजाविणाऱ्या आणि चार दिवसांपूर्वीच फिल्मी स्टाईलमध्ये सिडकोतील शिवाजी चौकात संदीप आठवले यांचा भरदिवसा खून करणाऱ्या संशयित ओम्या उर्फ छोटा खटकी उर्फ ओम चौधरी याच्यासह तिघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा प्रकार कॉलेजरोड परिसरातील चाय केटली कॅफे येथे घडला होता.
प्रणव प्रभाकर आगळे (रा. संत कबीरनगर, गंगापूर रोड. मूळ रा. गवळी पिंप्री, ता. सोनपेठ, जि. परभणी) याच्या फिर्यादीनुसार, गेल्या १८ तारखेला दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तो कॉलेज रोडवरील चाय केटली कॅफेत बसलेला होता.
त्यावेळी संशयित ओमप्रकाश पवार उर्फ खटकी, ओम चौधरी उर्फ छोट्या खटकी, मॅगी मोरे, प्रणय पगार (सर्व रा. सिडको) हे त्याठिकाणी आले. मागील भांडणाची कुरापत काढून संशयितांनी प्रणव आगळे यास शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली होती. परंतु संशयितांच्या दहशतीमुळे त्याने पोलिसात तक्रार केली नव्हती.
दरम्यान, गेल्या गुरुवारी (ता.२४) संशयितांनी सिडकोत संदीप आठवले याचा खून केला. त्याप्रकरणात संशयितांना अटक करण्यात आली.
त्यामुळे प्रणव आगळे याने गंगापूर पोलिस ठाणे गाठून संशयितांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790