नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): येथील प्रसिद्ध बिल्डर नरेश कारडा यांच्या विरोधात गुरुवारी पावणेदोन कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी दोन गुन्हे नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. यानंतर लागोपाठ तिसरा गुन्हा एकाच रात्रीत दाखल झाला असून, यामुळे कारडा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की शिंगवे बहुला, बार्न्स स्कूल रोडवरील सर्व्हे नंबर 298/2 एकूण क्षेत्र 0.83 आर ही देवेश इन्फ्रास्ट्रक्चर्स यांनी खरेदी केली होती. ती मिळकत नरेश कारडा व दिशा कारडा यांनी फिर्यादी प्रकाश चावला व इतर भागीदार यांची संमती न घेता कारडा दाम्पत्याने टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स येथे गहाण ठेवली. त्यापोटी त्यांना 9 कोटी 77 लाख 63 हजार 225.24 कोटी रुपये इतकी रक्कम मिळाली.
कारडा यांनी टाटा कॅपिटलला ते पैसे परत न करता व त्या मिळकतीवर कोणतेही बांधकाम न करता त्या रकमेचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केला. तसेच समजूतपत्र व कबुली दस्ताच्या करारनाम्याचे उल्लंघन करून 8,79,72,300 रुपये रकमेची फसवणूक केली आहे. एका रात्रीत तीन गुन्हे दाखल झाल्यामुळे सामान्य गुंतवणूकदार, तसेच बिल्डर क्षेत्रातही खळबळ माजली आहे. (देवळाली कॅम्प पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५३/२०२४)